रायरेश्वरावर ग्रामस्थ आणि महावितरण कर्मचाऱ्यांच्या मदतीने तब्बल ७५० किलो वजनाचे रोहित्र पठारावर नेण्यात यश

भोर : भोर तालुक्यातील ऐतिहासिक अशा रायरेश्वर पठारावरील ग्रामस्थ व महावितरण कर्मचाऱ्यांनी तब्बल ७५० किलो वजनाचे रोहित्र गुरुवारी(दि. ८ फेब्रुवारी) पठारावर नेले. गेल्या आठवड्यात रोहित्र नादुरूस्त झाल्यामुळे पठारावरील पवारवस्ती आणि वरची धानवलीतील कुटुंबाचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे पठारावरील जमिनीतील पाण्याची आर्द्रता कमी झाल्याने रोहित्र नादुरूस्त झाल्याचे महावितरणने सांगितले. नवीन रोहित्र वर नेण्यासाठी आठ किलोमीटरच्या अंतरासाठी मनुष्यबळाचा वापर करण्याचे मोठे आव्हान महावितरण समोर उभे होते. ठेकेदाराच्या कामगारांनी पठाराची वाट आणि भौगोलिक परिस्थिती पाहून पळ काढला. त्यामुळे रोहित्र वर नेण्याचा प्रश्न अवघड झाला होता. पठारावर जाण्यासाठी पाऊलवाटं अतिशय निमुळती, घसरडी, वळणावळणाची आहे. अनेक ठिकाणी गवत, झुडपे वाढली आहेत. तर लोखंडी शिडी काही भागात अति उताराची व अरुंद आहे.

Advertisement

अशा परिस्थितीत पठारावर एकट्याने चढणे देखील अवघड आहे. पठारावर जाण्यासाठी पाऊलवाट व लोखंडी शिडीशिवाय मार्ग नाही. परंतु, सलग दोन दिवस मोहीम राबवून रोहित्र वर नेण्यात आले. त्यासाठी रस्सी, पाईप व लाकडी वासे वापरून डोली सारखा प्रकार केला. तीनशे फूट कातळ कडा लोखंडी शिडीने पार केल्यावर दुसऱ्या दिवशी पवारवाडीला रोहित्र नेले. कनिष्ठ अभियंता सागर पवार, सचिन कुलकर्णी, रणजीत बाबर, भगवान ठाकूर, गुणाजी तुपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आव्हान स्वीकारून रोहित्र वर नेऊन वीजपुरवठा सुरू केल्यावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page