भटक्या-विमुक्त समाजाची अवस्था भीषण – पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही भटक्या विमुक्त जाती समुहांना गाव, घर, शेती, सन्मान मिळत नाही. अजिंठा-वेरूळ लेण्यांचे कोरीवकाम करणारा, वेगवेगळी कला कौशल्य असलेला समाज आज भीतीचं पांघरुण घेत निद्रिस्त झाला आहे. या समाजाला आरक्षणाची खरी गरज आहे,संघटित नसल्यामुळे भटक्या विमुक्तांना वाली नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन व डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चांगुलपणाच्या चळवळीच्या भटक्या विमुक्त जाती जमाती-आव्हाने आणि वाटचाल या दिवाळी अंकाचे प्रकाशन पद्मश्री प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

समाजातील भटक्या- विमुक्त जाती- जमातींमधल्या वडार, कैकाडी, ओतारी, मांग गारुडी, डवरी गोसावी, पारधी, छर्रा, हेळवी, वासुदेव, गोंधळी अशा अनेक जाती-जमातींच्या समोर खूप आव्हाने असूनही हे समाज एकसंध राहिले आहेत. त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्यांचे अनुभव थक्क करणारे आहेत.विपरीत परिस्थितीशी झगडताना आपल्या कामावरची श्रध्दा, निष्ठा कायम ठेवून समाजावरील प्रेमातून लिहिलेले लेख तसेच आत्मकथन आपल्याला कार्यप्रवृत्त करणारे वाटत असल्याचे संपादिका शुभांगी मुळे म्हणाल्या.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, चांगुलपणाच्या चळवळी दिवाळी अंकाच्या संपादिका शुभांगी मुळे, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे अध्यक्ष सीए. राज देशमुख व अध्यासन प्रमुख डॉ. सुनील भंडगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page