मुळशीतील शेतकरी कुटुंबाचा भक्ती आणि शेतीचा अनोखा संगम; एक एकर शेतात साकारले २०० फूट ज्ञानोबा माऊली
मुळशी : तालुक्यातील वातुंडे येथील शेतकरी कुटुंबाने शेती, श्रद्धा आणि सर्जनशीलतेचा अद्वितीय संगम साधत एक अद्भुत कलाकृती साकारली आहे. शेतकरी महादेव राघू शिंदे व नामदेव राघू शिंदे यांच्या शेतात नाचणीच्या पिकातून संत ज्ञानेश्वर महाराजांची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.
ही आगळीवेगळी कलात्मक निर्मिती महादेव शिंदे यांचे पुत्र बाळकृष्ण शिंदे आणि सून लक्ष्मी शिंदे यांनी अत्यंत भक्तिभावाने केली आहे. तब्बल २०० फूट लांब आणि १५० फूट रुंद आकारात ही मूर्ती चाळीस गुंठ्यांच्या माळरानात उभी केली गेली आहे.
२२ दिवसांपूर्वी नाचणीचे बियाणे पेरून या हिरव्या रोपांद्वारे मूर्तीचा आकार तयार करण्यात आला. मूर्तीच्या गळ्यातील हारासाठी मेथीच्या बियांचा, तर मूळ मातीचा तपकिरी रंग मूर्तीच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतो. झेंडूच्या फुलांनी “ज्ञानेश्वरी”चा आकार अधोरेखित करण्यात आला असून, हारातील गुलाबी भागासाठी चाळीस किलो गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला आहे.
शेती, कला आणि भक्तीचा त्रिवेणी संगम साधणारी ही अद्वितीय निर्मिती सध्या परिसरात आकर्षणाचे केंद्र बनली आहे. अनेक भक्त, नागरिक आणि पर्यटक दर्शनासाठी शेतात भेट देत असून, शिंदे कुटुंबाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.