वनविभागाच्या दोन हजार ९४२ गुंठे जमिनीची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री
तळेगाव दाभाडे : वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बनावट पात्रांच्या आधारे वन विभागाच्या दोन हजार ९४२ गुंठे जमिनीची विक्री करत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार दुय्यम निबंधक मावळ दोन, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे. १६ डिसेंबर २०२० ते २१ जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
रफिक दाऊद रुवाला (वय ७३ वर्षे), आली अजगर (वय २० वर्षे), एक महिला (सर्व रा. नेरूळ रोड, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आंबवणे येथील वनपाल संजय आहिरराव यांनी मंगळवारी (दि. २१) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत काही क्षेत्र खासगी वन संपादन अधिनियम १९७५ अंतर्गत येते. त्या जमिनीची विक्री करण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असते.
आरोपींनी या जमिनीतील दोन हजार ९४२ गुंठे जमीन विक्रीयोग्य असल्याचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पत्र तयार केले. त्या पत्राच्या आधारे दुय्यम निबंधक मावळ दोन, तळेगाव दाभाडे येथे तीन वेगवेगळे दस्त करून वन विभागाचे क्षेत्र बेकायदेशीरपणे हस्तांतरित केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.