भोर तालुक्यातील रांझे येथील “टफ कोट पॉलिमर्स” कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
कोंढणपूर : भोर तालुक्यातील रांझे गावच्या हद्दीतील गट नंबर १०८ मधील “टफ कोट पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीला आग लागल्याची घटना आज बुधवारी(दि. २७ मार्च) सकाळी १०:१५ च्या सुमारास घडली. या कंपनीमध्ये २७ कामगार काम करत असताना अचानक पेंटच्या बॅलरला आग लागली. काही क्षणातच या लागलेल्या आगीने अचानक भीषण रूप धारण केले. त्यामुळे या कंपनीच्या बाजूला असणारी कंपनी “एस्कोपेंट प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीला सुद्धा आग लागली. आगीमध्ये कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
या घटनेने कंपनीतील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी व कंपनीतील कामगारांनी पोलीस स्टेशन व डायल ११२ येथे या घटनेची माहिती दिली. राजगड पोलीसांना या घटनेची माहिती प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन भोर फायर स्टेशन, कात्रज फायर स्टेशन आणि नांदेड सिटी (pmrd) या फायर स्टेशनला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली आहे. कंपनी परिसरात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले आहेत. सदर आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु या आगीमध्ये कंपनीमधील लाखो रुपयांच्या साहित्यांचे जळून नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.