रणजित शिवतरे यांच्या पुढाकारातून उत्रौली शाळेत भविष्यवेधी व्हर्च्युअल क्लासरूम; दर्जेदार शिक्षणाला डिजिटल बळ
मुख्य संपादक : दिपक महांगरे
भोर : तालुक्यातील उत्रौली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भविष्यवेधी व्हर्च्युअल क्लासरूम साकारण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शाळा एक राज्य मॉडेल म्हणून उदयास येत आहे. या नवकल्पनात्मक प्रकल्पाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे मा. सभापती रणजित शिवतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. “गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत आता विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षणाची जोड मिळाली असून, डिजिटल शिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि शैक्षणिक गुणवत्ताही वाढेल,” असा विश्वास शिवतरेंनी या वेळी व्यक्त केला.
या वेळी शिक्षण संचालक प्राथमिक, पुणे व डिजिटल डेन पुणे यांच्या सहकार्याने साकार झालेल्या व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन जिल्हा गुणवत्ता यादीत झळकलेल्या अद्वैत दळवी, काव्य शेडगे, विघ्नेश येडवे या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक अमर उभे यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेतील सोलर सिस्टिम, एम.एस.सी.आय.टी प्रशिक्षण, ग्रंथालय, संगणक शिक्षण, प्रयोगशाळा आणि डिजिटल क्लासरूममुळे आज या शाळेतील गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा लक्षणीयरीत्या वाढत आहे. यामध्ये मुख्याध्यापक सविता चोरगे यांच्यासह संगीता पापळ, अनिता सुतार, विठ्ठल दानवले, अश्विनी पवार, अनिता लोखंडे, वैशाली चिंचकर, राजू गुरव, अफरीन तांबोळी व बोराडे यांचे विशेष योगदान असून, त्यांच्या टीमवर्कचे आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी रणजित शिवतरे यांनी चालू वर्षी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सायकल भेट दिली जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच विद्यार्थ्यांनी खेळ, कला, संगीत, नाट्य, क्रीडा यांसोबतच स्पर्धा परीक्षा, नवोदय, एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी. यामध्येही यश मिळवून अधिकारी व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश शिवतरे, भगवान शिवतरे, शिवाजी शेटे, सचिन शिवतरे, सागर कुंभार, दशरथ शेटे, अशोक शेटे, सुनील सुतार, सारिका शिवतरे, स्नेहल शिवतरे, नंदा धोंडे, मनोज खोपडे, सचिन पाटणे, रघुनाथ भोसले, शामराव सावले, अविनाश उभे आणि अनेक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.