‘आरटीओच्या वायुवेग’ पथकाचे खेड शिवापूरमध्ये रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन
मुख्य संपादक : दिपक महांगरे
खेड शिवापूर : अपघातविरोधी उपाययोजना आणि रस्ते सुरक्षा याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन (आरटीओ) पुणे कार्यालयातील ‘वायुवेग’ पथकाच्या वतीने खेड शिवापूर येथे मंगळवारी (दि. २९ जुलै) विशेष मार्गदर्शन करण्यात आले. सध्या रस्त्यावर पडलेले खड्डे, अपुरी रस्ता दुरुस्ती आणि अपघातसदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर, काम सुरू असताना घ्यावयाच्या सुरक्षा, खबरदाऱ्या याविषयी महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांना देण्यात आली.
याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक विनोद जाधव, निरीक्षक समीर ढेंबरे, विशाल डोंबाळे, विशाल कुंभार, तसेच स्थानिक ठेकेदार, यंत्रणा चालक, वाहतूक सहायक कर्मचारी व वाहनचालक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना निरीक्षक विनोद जाधव यांनी सांगितले की, “रस्त्याचे काम सुरू असताना योग्य साइनबोर्ड्स, रात्री रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, सिग्नल लाइट्स, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर टेप्स, ट्रॅफिक कोन यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. वाहतुकीचे योग्य नियोजन, अनावश्यक गर्दी टाळणे आणि स्थानिक पोलीस व वाहतूक नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवल्यास अपघातांची शक्यता कमी करता येते.”
पुढे बोलताना निरीक्षक समीर ढेंबरे म्हणाले, “वरील उपाययोजना प्रभावीपणे अमलात आणल्यास रस्त्याच्या कामामुळे होणारे अपघात मोठ्या प्रमाणात टाळता येतात. त्यामुळे यंत्रणांनी व ठेकेदारांनी या सूचनांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.”
यानंतर वायुवेग पथकाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील सुरक्षित वर्तन, वाहतूक नियम, तसेच रस्ता बांधणीदरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य धोका परिस्थितीबाबत सखोल माहिती दिली. प्रत्यक्ष कृतीद्वारे अपघात टाळण्याचे उपाय, सुरक्षा साधनांचा वापर, आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद कसा द्यावा याचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले. हा उपक्रम केवळ औपचारिकतेपुरता न राहता प्रत्यक्ष सुरक्षाविषयक अंमलबजावणीस चालना देणारा ठरावा, अशी अपेक्षा उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.