भोर महावितरणच्या ढिसाळ कारभारा विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी आंदोलन; मुख्य अभियंता महावितरण बारामती यांना निवेदन
भोर : भोर शहरासह ग्रामीण भागात मागील चार महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने सामान्य जनता अक्षरशः वैतागून गेली आहे. परिणामी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा सर्वांना नाहक त्रास सहन करून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने सोमवारी(दि.२४ जून) जिल्हा तसेच तालुका युवक काँग्रेसच्या वतीने राजवाडा चौक येथे आंदोलन छेडण्यात येणार आहे. याचे निवेदन मुख्य अभियंता महावितरण बारामती यांना देण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश टापरे यांनी दिली.
अनेक दिवस झाले भोर तालुक्यामध्ये सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे शेतकरी, छोटे-मोठे व्यावसायिक तसेच अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावित आहे. व्यवसायिकांना मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच नागरीकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे विजेच्या लपंडावामुळे विजेचा दाब कमी-जास्त होत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. वरील सर्व अडचणी या पावसाळया अगोदर अधिकारी वर्गाने योग्य त्या उपाय योजना न केल्याने येत आहेत. या सर्व समस्यांना महावितरणचे अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्याने तात्काळ त्यांची बदली करावी. या प्रमुख आणि अन्य मागण्यांसाठी सोमवारी आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी युवक काँग्रेस भोर तालुकाध्यक्ष नितीन दामगडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तोसिफ आतार, उपसरपंच प्रदीप पिलाने उपस्थित होते.