घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ताजी असतानाच भोर तालुक्यातील सारोळ्यातही कोसळले होर्डिंग
सारोळा : भोर तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून पुणे-सातारा महामार्गावर असणाऱ्या सारोळा(ता.भोर) येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. विशेष म्हणजे हे होर्डिंग अनधिकृत आहे. सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. रस्त्याच्या कडेला असलेलं लोखंडी होर्डिंग सुदैवानं रस्त्यावर पडले नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा गावच्या हद्दीतील धिवार पेट्रोलपंप शेजारी असणारे हे होर्डिंग कोसळले आहे. पुणे-सातारा महामार्गावर दुरवस्था झालेले अशी अनेक होर्डिंग वर्षानुवर्षे उभे आहेत. कमकुवत होऊन ते वादळ वाऱ्यामुळे कोसळून सर्वसामान्यांचे बळी जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, त्याकडे संबंधीत प्रशासन काणाडोळा करीत आहे. अपघात झाल्यावरच या गंभीर प्रश्नाकडे शासन लक्ष देणार का? असा सवाल महामार्गालगतच्या गावातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील भोर तालुक्यात शिंदेवाडी ते सारोळ्यापर्यंत तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरात अनेक बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग लावलेले आहेत. कोणतीही सुरक्षितता न बाळगता हे होर्डिंग उभे केली जातात. अशी होर्डिंग महामार्गावर पडून मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने लवकरात लवकर या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या बाबतीत पी.एम.आर.डी. चे तहसीलदार तथा प्रमुख सचिन म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पुणे प्राधिकरणाच्या कक्षातील सर्व होर्डिंगचा सर्व्हे झाला असून येत्या चार दिवसात हद्दीतील अशा अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणार असून असे होर्डिंग नामशेष करण्यात येतील. तसेच या पडलेल्या बेकायदेशीर होर्डिंगची माहिती घेऊन त्या संबंधितांवर देखील लवकरच कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.