भोर तालुक्यातील शिंद येथील वीर जवाणाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी; पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान झाले निधन
भोर : सीमा सुरक्षा दल(बीएसएफ) मध्ये कार्यरत असणारे भोर तालुक्यातील शिंद येथील जवान कालिदास तानाजी भालेघरे यांचे शुक्रवारी(दि. २६ जुलै) उपचारा दरम्यान पुण्यातील एका रुग्णालयामध्ये दुखःद निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. आजाराशी देत असलेली त्यांची झुंज शुक्रवारी थांबली असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वीर जवान कालिदास भालेघरे हे साल २००६ पासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांनी या कार्यकाळात देशाच्या विविध भागांमध्ये चोख कामगिरी बजावली. यामध्ये जम्मू-कश्मीर, दिल्ली, आसाम, साऊथ बंगाल आणि त्रिपूरा या ठिकाणी त्यांनी आपले कर्तव्य बजावले. मागील काही वर्षांपासून ते सीसुबल पलौरा कैम्प जम्मू-कश्मीर मध्ये काम पाहत होते. कालिदास हे मनमिळाऊ स्वभावाचे अभ्यासू व्याकिमत्व होते. त्यांना कला, क्रिडा क्षेत्रासहित अभंग गायनाची देखील आवड होती.
वीर जवान कालिदास भालेघरे यांचा पार्थिवदेह शनिवारी(दि. २७ जुलै) सकाळी त्यांच्या मूळ गावी शिंद(ता.भोर) येथे आणला जाणार आहे. यावेळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या या निधनाने त्यांच्या कुटुंबासहीत संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, २ भाऊ, बायको, २ मुली व १ मुलगा असा परिवार आहे.