भोर तालुक्यातील प्राथमिक शाळा सारोळा येथील विद्यार्थी गिरवत आहेत चक्क ‘स्पॅनिश’भाषेचे धडे…
संपादक : दिपक महांगरे
सारोळा : प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे.प्राथमिक शाळा ही एक अशी व्यवस्था आहे. जिथे विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तोंड ओळख होते.तसेच मुले घरापासून दूर स्वतंत्र राहायला शिकतात. हे प्रत्येक व्यक्तीसाठी सक्तीचे व आवडीचे शिक्षण असते. उद्याची उज्ज्वल पिढी घडविण्याचे काम करणारी पवित्र विद्या मंदिर म्हणजेच प्राथमिक शाळा. ज्ञानदान हे पवित्र कार्य मानले जाते आणि ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना ज्ञानाचे भांडार म्हंटले जाते.भावी पिढी घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. आणि ती जबाबदारी सक्षमपणे पेलताना सारोळा प्राथमिक शाळेतील शिक्षक दिसत आहेत. त्यातील च एक शिक्षिका वंदना कोरडे. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चक्क स्पॅनिश भाषा शिकवत आहेत. ही भाषा शिकताना मुले मुलीही उत्साहाने सहभागी होत आहेत. येथील कौशल्यपूर्ण शिक्षकांमुळे आजूबाजूला परिसरात भरपूर खासगी संस्था असताना येथील पालकांचा कल प्राथमिक शाळे कडे जास्त असल्याचा दिसून येतो. शिक्षिका वंदना कोरडे यांनी हा उपक्रम एक वर्ष भरापूर्वी गोरे बुद्रुक.खडकवासला येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केला होता. प्रत्येक खासगी शाळांमधे एकतरी परकीय भाषा शिकवली जाते. त्यांना कुठे तरी वाटले की आपली प्राथमिक शाळा यामधे मागे आहे. मग त्यांनी त्यावर अभ्यास करायला सुरुवात केली. त्यामधे त्यांना समजले की जगात मुख्य ४ भाषा आहेत. त्यामध्ये इंग्लिश,चायनीज,हिंदी आणि स्पॅनिश ही भाषा चौथ्या क्रमांकावर आहे मग त्यांनी स्पॅनिश भाषा शिकवण्याचे ठरवले. याच्या नोट्स मराठी मध्ये कुठेही उपलब्ध नव्हत्या. मग त्यांना विद्यार्थ्यांना समजेल असे स्पॅनिश-इंग्लिश आणि इंग्लिश-मराठी असे शिकवण्यास सुरुवात केली. प्रथमतः त्यांनी १ ते १० अंक स्पॅनिश भाषेमध्ये शिकवले.ते त्यांना अवगत झाल्यावर हळू हळू त्यांनी १ ते १०० अंक,पक्षी,प्राणी,दैनंदिन संवाद शिकवले. गोरे बुद्रुक येथे या उपक्रमास प्रसिद्धी माध्यमांनी कमालीची प्रसिद्धी दिली. गेल्या ३ महिन्यांपासून शिक्षिका वंदना कोरडे यांची बदली प्राथमिक शाळा सारोळा येथे झाली आहे. फक्त तीनच महिन्यात येथील विद्यार्थी १ ते १००० अंक, प्राणी, पक्षी, दैनंदिन संवाद स्पॅनिश भाषेत शिकले आहेत. फक्त स्पॅनिश च नव्हे तर इंग्लिश भाषेत ही विद्यार्थ्याची कमालीची प्रगती पाहायला मिळत आहे. प्रत्येक शिक्षकांमध्ये शिक्षिका वंदना कोरडेंसारखे शिकवण्याचे कौशल्य असावे असे सर्व पालकांचे मत आहे. तसेच नुकताच शिक्षिका वंदना कोरडे यांनी क्यू आर कोड बनवण्याचा एक उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये पालक मुले आणि शिक्षक सर्वांनाच क्यू आर कोड बनवणे शिकवले आहे ज्यामध्ये शाळेतील सर्व औषधी वनस्पतींना मुलांनी स्वतः बनवलेले क्यू आर कोड लावले आहेत. प्राथमिक शाळा सारोळा येथे कल्पक शिक्षक असल्यामुळे नियमितपणे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.शाळांमध्ये स्थानिक,भौगोलिक, सामाजिक परिस्थिती स्तर विचारात घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते या उपक्रमांमुळे शिक्षक – विद्यार्थी – पालक – समाज यांच्यामधील सहसंबंध सकारात्मक होतात.मुलांची एकाग्रता वाढावी,त्यांना सलगपने बसण्याची सवय लागावी,यासाठी छोटे छोटे उपक्रम घेत असतात.त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते असे शिक्षकांचे मत आहे.त्यामुळे आज शनिवार (दि.१४) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथील सर्व २३१ मुलांची परिसर सहल आयोजित केली होती.परिसरातील नामांकित हॉटेल नानांची वाडी येथे जादूच्या प्रयोगांचे आयोजन केले होते. जादूचे विविध प्रयोग पाहून मुलांची हसून हसून पुरती वाट लागली .या ठिकाणी सर्व मुलांनी मनसोक्त वेलकम ड्रिंक , समोसे , मिसळपाव याचा आस्वाद घेतला . सहलीमध्ये मुले गप्पा , गाणी , गोष्टी , खेळ यामध्ये रममान झाली. सहलीचे आयोजन मुख्याध्यापक विजयकुमार थोपटे, छाया हिंगे, जया जाधव , जयश्री शिर्के , कांचन थोपटे ,संदीप सावंत, वंदना कोरडे , अर्चना वानखडे आदींनी केले होते. अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना नावीन्य आणि आनंद मिळावा हा या सहलिमागचा उद्देश होता.