नवले पुलावर झालेल्या अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू…
पुणे : नवले पुलाजवळ सिग्नलवर थांबलेल्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने किमान सहा वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ३४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
बुधवारी(दि.२५)रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान हा अपघात झाला.संदेश आनंदा खेडेकर असे मृताचे नाव असून तो टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कात्रज-कोंढवा रोड येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्याहून बाणेरच्या दिशेने जाणारा सिमेंट भरलेला ट्रक, ट्रकचालक पंकज राजाराम नाटकरे (२२, कर्नाटकातील रहिवासी) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने किमान सहा वाहनांना धडक दिली.
अपघातामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिकांनी तातडीने आपत्कालीन सेवा 112 ला अपघाताची माहिती दिली.
सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले.
दहा दिवसांतील हा दुसरा अपघात होता, ज्यामुळे परिसरातील सुरक्षितता आणि रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल चिंता वाढली.
भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले