उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पडताळणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे अधिकाऱ्यांना आदेश
पुणे : उमेदवारांचा निवडणूक खर्च योग्य पद्धतीने नोंदविला जाईल, यावर विशेष लक्ष देण्यासह निवडणूक खर्चाची पडताळणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत हे आदेश देण्यात आले. याप्रसंगी निवडणूक खर्च निरीक्षक, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे. मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणीदेखील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेऊन पूर्वतयारी करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने जिल्ह्यात परवानाधारक शस्त्रे जमा केली आहेत. त्यांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय निवडणूक निरीक्षकांना देण्यात यावी, तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सी-व्हिजिल, खर्च, माध्यम संनियंत्रण समिती यांच्यासह इतर अहवाल वेळोवेळी द्यावेत. अशा सूचना डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या आहेत.