अंगणवाडी सेविकांचे मुळशी पंचायत समितीसमोर बोंबा बोंब आंदोलन, अंगणवाड्यांना टाळं; साखळी आंदोलन सुरू राहणार
मुळशी (प्रतिनिधी) : विविध मागण्यांच्या पू्र्ततेसाठी मुळशी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी मुळशी पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी आंदाेलन सुरु केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मुळशी तालुक्यातील एकही अंगणवाडी सुरू करू देणार नाही, अशी भूमिका अंगणवाडी सेविकांनी घेतली आहे.
शासनाने अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी दयावी व मानधन न देता सरकारी वेतनसहित पेंशन योजना लागू करावी. वीस हजार मदतनीस तर २६ हजार सेविकांना मानधन मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मुळशी तालुक्यातील ३५० अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आंदोलन पुकारले आहे.
मुळशी तालुक्यातील बहुतांशी अंगणवाड्या बंद ठेवून या अंगणवाडी सेविकेंनी सरकारच्या नावाने मुळशी पंचायत कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन केले. अंगणवाडी सेविकांना २६ हजार रुपये, तर मदतनीसांना २० हजार रुपयांचे वेतन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मुळशी तालुक्यातील एकही आंगणवाडी सुरू करू देणार नाही, अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.