राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात मोठी कारवाई, विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने मोठी कारवाई केली आहे. जनावरांच्या खाद्यासोबत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी १९ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दुपारी चारच्या सुमारास बंगलोर-मुंबई महामार्गावर रावेत गावच्या हद्दीत केली आहे.

बंगलोर-मुंबई महामार्गावरुन विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांना मिळाली. त्यानुसार, रावेत गावच्या हद्दीतील हॉटेल हेमराज समोर सापळा रचण्यात आला. पथकाने दुपारी चारच्या सुमारास भारत बेंझ कंपनीचे १४ चाकी वाहन (एमएच १५ एफव्ही ७९४०) आडवले.

वाहनामध्ये ५० किलो वजनाचे जनावराचे खाद्य भरलेले ८० पोती आढळून आली. या पोत्यांच्या खाली गोवा राज्य निर्मीत आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. या कारवाईत ७५० मि.ली. क्षमतेच्या प्रत्येक बॉक्समध्ये १२ बाटल्या या प्रमाणे ४३१ बॉक्स (५,१७२ बाटल्या ), १८० मिली क्षमतेच्या प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या याप्रमाणे ७८५ बॉक्स (३७६८० बाटल्या) तसेच ५०० मिली क्षमतेच्या किंगफिशर बिअरचे ४० बॉक्स (९६० बाटल्या ) असा एकूण ७४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला. पथकाने रॉयल ब्ल्यू व्हिस्की, आईस मॅजिक ऑरेंज वोडका व रॉयल ब्लंक माल्ट व्हिस्की च्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पथकाने मद्य आणि वाहन असा एकूण १ कोटी १९ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Advertisement

या कारवाईत विजय चंद्रकांत चव्हाण (वय ५३ वर्षे, रा. सातारा) व सचिन निवास धोत्रे (वय ३१ वर्षे, रा. सांगली) या दोघांना अटक केली आहे. त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता ४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्टर राज्य आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक, अमलबजावणी व दक्षता सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क एफ विभाग पुणे निरीक्षक दिपक सुपे, सासवड विभागाचे निरीक्षक प्रविण शेलार, दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, बडदे, आशिष जाधव, मोहिते, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, डी. के. पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page