भोर तालुक्यातील जयतपाड मथील जलजीवनच्या अपुऱ्या कामामुळे महिलांची पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट
भोर : जयतपाड (ता.भोर) येथील वाड्यावस्त्या मिळून मंजूर असलेल्या जलजीवन मशिन योजनेची मुदत संपूनही काम अपुर्ण असल्याने टँकरग्रस्त असलेल्या जयतपाडमधील हुंबेवस्तीला पाणी टंचाई जाणवू लागल्याने तेथील महिलांना विचारेवाडी (जयतपाड) येथील जुन्या जलवाहिनीच्या नळावरुन पाणी भरुन डोक्यावर हंडे घेत दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. जयतपाड ग्रामपंचायतीकडून हुंबेवस्तीसाठी पंचायत समितीकडे टँकरचा प्रस्ताव दिला असून टँकर सुरु करण्याची मागणी सरपंच सुजाता तानाजी दिघे, बापू डोईफोडे, रामभाऊ हुंबे, बापूराव अहिरे यांसह ग्रामस्थ करीत आहे.
८१७ लोकसंख्या असलेल्या जयतपाड ग्रामपंचायतीमधील हुंबेवस्ती, रांजणवाडी, निवंगणी, ढाकवस्ती (गावढाण), विचारेवाडीसाठी जलजीवन मशिन योजनेतून एक कोटी नऊ लाखांचा निधी मंजूर असून कामाची मुदत फेब्रुवारी २०२४ रोजी संपली आहे. परंतू काम अद्याप पुर्ण नसून कामासंदर्भात संबधीत ठेकेदार ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. या योजनेतील विहिर, ३ एचपी पंपींग मशनरी, हुंबेवस्तीची टाकीचे बांधकाम झाले असून हुंबेवस्ती रांजणवाडी येथील जलवाहिनीची कामे अर्धवट आहेत. यातील टँकर ग्रस्त असलेल्या हुंबेवस्तीत ७२ लोकसंख्या असून येथील ग्रामस्थांना गेल्या दहाबारा दिवसांपासून दोन किलोमीटरवरून पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. यातील काही वृद्ध महिलांना काठीचा आधार घेत डोक्यावर हंडा घेऊन चढणीच्या वाटेने पाणी आणावे लागत आहे.
टँकर मंजूर होईपर्यंत ठेकेदाराने खाजगी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी सरपंच सुजाता दिघे यांनी केली आहे. तर ठेकेदाराला काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना दिल्या असून ठेकेदाराला नोटीस बजावली असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.