खेड शिवापूर मधील व्यावसायिकाचा बिहार मध्ये खून; ‘सायबर बिझनेस ट्रॅप’ रचून केला घात
खेड शिवापूर : पुण्यातील कोथरुड परिसरात राहणाऱ्या व खेड शिवापूर (ता. हवेली) येथे “रत्नदीप सेंट्रिफ्युगल कास्टिंग बेअरिंग” नावाची कंपनी असणाऱ्या व्यावसायिकाचा बिहारमध्ये खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या उद्योजकास ‘सायबर बिझनेस ट्रॅप’ रचून बोलावून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पाटणा एअरपोर्ट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, १७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५, रा. डी.पी. रस्ता, कोथरूड) असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे.
बिहारमध्ये रस्त्याच्या कडेला आढळला शिंदेंचा मृतदेह
बिहार मधील जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. १२ एप्रिल) मननपूर गावाजवळ रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. सोमवारी (दि. १४ एप्रिल) मृतदेहाची ओळख पटली असून, ते पुण्यातील उद्योजक लक्ष्मण शिंदे असल्याचे निष्पन्न झाले.
पाटणा येथे पोचल्यानंतर मुलीला मोबाईलवर पाठवला होता संदेश
लक्ष्मण शिंदे यांची खेड शिवापूर येथे ‘रत्नदीप सेंट्रिफ्युगल कास्टिंग बेअरिंग’ कंपनी आहे. त्यांची सेंट्रिफ्युगल कास्टिंग संबंधी शिवराज सागी नावाच्या व्यक्तीशी फोन आणि ई-मेलवर व्यावसायिक चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांना पाटणा येथे बोलावण्यात आले. ११ एप्रिल रोजी शिंदे विमानाने पाटणा येथे गेले. तेथे पोहोचल्यानंतर ते मुलीशी फोनवर बोलले. त्यांनी रात्री साडेआठ वाजता व्हॉटसॲपवर संदेशही पाठविला. त्यात ‘मी आता झारखंडला कोळसा खाणीत प्लांट क्रमांक तीनमध्ये बाराशे फूट खाली मशिन आणि साधने पाहण्यासाठी जात आहे. तिथे एकूण सात प्लांट्स आहेत, जे केंद्र सरकार अंतर्गत कोल इंडिया लि. मार्फत चालवले जातात,’ असे म्हटले होते.
कोथरूड पोलिसांचे पथक बिहरला रवाना
परंतु त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे १२ एप्रिलला कोथरूड पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार देण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे कोथरूड पोलिसांचे पथक पाटणा येथे पाठवण्यात आले. शिंदे यांचे पाटणा विमानतळाबाहेर अपहरण झाले. त्यानंतर नालंदा, गया आणि पाटणा परिसरात फिरवण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
सायबर बिझनेस ट्रॅप’ रचून खून केल्याचे तपासात समोर
‘सायबर बिझनेस ट्रॅप’ मध्ये आरोपी विमानतळावरून लोकांना फसवून बोलावतात. त्यांना दुर्गम भागातील शेतामध्ये डांबून ठेवतात, त्यांच्या बँक खात्यांमधून पैसे उकळतात. उद्योजक लक्ष्मण शिंदे यांना ‘सायबर बिझनेस ट्रॅप’ रचून व्यवसायाच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यांच्या बॅंक खात्यातून जबरदस्तीने ९० हजार रुपये काढून घेण्यात आले. या खून प्रकरणात तेथील पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवून १७ संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पाटणा एअरपोर्ट पोलीस करत आहेत.