अग्निपंख फौंडेशनने रायरेश्वर गडावर बांधलेल्या जि.प.शाळेचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
भोर : भोर तालुक्यातील रायरेश्वर गडावर अग्निपंख फौंडेशनने बांधलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन शालेय इमारतीचे लोकार्पण रविवार(दि.२६ नोव्हेंबर) रोजी दुपारी १२:३० वाजता करण्यात आले. शाळेच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण सोहळा संदीप भोसले (सहा.आयुक्त जी.एस.टी पनवेल)आणि पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक दिपक माने यांच्या शुभहस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला बहुसंख्येने लोक उपस्थित होते. त्यामधे शिक्षक, गडावरील स्थानिक रहिवाशी, अग्निपंख फाऊंडेशनची संपूर्ण टीम, तळजाई भ्रमण समूहाचे सदस्य, उद्योजक आदी उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गडावर वृक्षारोपणही करण्यात आले. कुठल्याही प्रकारची सरकारी मदत न घेता अहमदनगर जिल्ह्यातील ही अग्निपंख फाऊंडेशन संस्था असून सुद्धा ही शाळा उत्कृष्ट पद्धतीने बांधून दिल्याबद्दल अग्निपंख फाउंडेशन वर सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या रायरेश्वराच्या साक्षीने केली, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी इमारत उभारणी करण्याचे कामाची संधी अग्निपंख फाउंडेशनला मिळाल्यामुळे आम्ही स्वतःला नशीबवान समजत असल्याचे यावेळेस अग्निपंख फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले. उपस्थितांचा सत्कार करून दुपारी २:३० वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला.