भाटघर धरण पूर्ण भरले; धरणाच्या स्वयंचलित ४५ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू
भोर : भोर तालुक्यातील ब्रिटीशकालीन भाटघर धरण आज शुक्रवारी(दि. २ ऑगस्ट) सकाळी पूर्ण भरल्यामुळे धरणाच्या स्वयंचलित ४५ दरवाज्यातून (मोऱ्या) पाण्याचा विसर्ग निरा नदी पात्रात सुरु झाला आहे. सुमारे १६३१ क्युसेसन वेगाने पडणाऱ्या पाण्यामुळे धबधब्याचे दृश्य दिसत आहे. यामुळे पूर्व भागाच्या तालुक्यातील शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या भाटघर धरणाची (येसांजी कंक जलाशय) साठवण क्षमता २३ टीएमसी आहे. आज शुक्रवारी सकाळी हे धरण पूर्ण भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असून पाणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन वर्षापेक्षा १० दिवस अगोदरच धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे प्रशासन, पाटबंधारे विभागाने दक्ष राहून धरणाच्या ४५ स्वयंचलित दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु केला. यावेळी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसिल कार्यालयातील अधिकारी गणेश टेंपले व अन्य अधिकारी उपस्थित होते.
धरणाला एकूण ८१ दरवाजे असून ४५ स्वंयचलित, ३६ अस्वंयमचलित दरवाजे आहेत. धरणातून अधिक पाणी सोडण्यात आल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शंभर टक्के धरण भरल्याने वेळवंडी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.