नातेवाईकांना मेसेज पाठवून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची आत्महत्या; गुंजवणी धरणात सापडला मृतदेह
राजगड : राजगड (वेल्हे) तालुक्यातील कानंद गावाच्या हद्दीत गुंजवणी धरणात उडी मारुन पुण्यातील महाविद्यालयीन तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. हा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. आत्महत्या करण्या अगोदर तरुणाने नातेवाईकांना मोबाईलवर मेसेज पाठवला होता. करण शंकर दीक्षित (वय २४ वर्ष, रा. धनकवडी, पुणे ) असे मयत तरुणाचे नाव असून हा प्रकार बुधवारी (दि. १६ एप्रिल) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याचा शोध सुरु केला. चार तासांच्या शोधमोहिमेनंतर वेल्हे पोलिसांनी हवेली तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या रेस्क्यू पथकाच्या मदतीने करण याचा मृतदेह धरणातील खोल पाण्यातून बाहेर काढला.
वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत करण दिक्षित हा पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. मंगळवारी (दि. १५ एप्रिल) रोजी तो घरातुन दुचाकी गाडीवरून निघून आला. त्याने घरातील नातेवाईकांना मी आत्महत्या करत आहे असा मेसेज मोबाईलवर मेसेज पाठवला होता. त्यामुळे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. या बाबत नातेवाईकांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात करण हा बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती. करण दिक्षित याने धरणात उडी मारुन आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वेल्हे पोलिसांना एका तरुणाने गुंजवणी धरणात उडी मारली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वेल्हे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रसाद मांडके आणि हवालदार युवराज सुर्यवंशी यांनी हवेली तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे रेस्क्यू पथकासह घटनास्थळी धाव घेतली. रेक्सू पथकाचे प्रमुख तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरघे, संदीप सोलस्कर, निलेश जाधव तसेच कानंदचे पोलीस पाटील संजय कडू यांनी धरणात उतरून शोध कार्य सुरू केले. चार तासानंतर दुपारी चार वाजण्याच्या खोल पाण्यातून करण याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
खोल पाणी असल्याने मृतदेह शोधण्यासाठी रेस्क्यू पथकाला मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह वेल्हे येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. धरणाच्या काठावर मयत करण दीक्षित याचे कपडे, मोबाईल फोन, दुचाकी गाडीची चावी, चप्पल त्याचा मृतदेह आढळला. करण याने शेवटचा फोन सकाळी ७ वाजून पन्नास मिनिटांनी केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे त्याने या नंतर कपडे, मोबाईल काढून धरणात उडी मारली असावी, असा अंदाज आहे. सदर घटनेबाबतचा अधिक तपास वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.