सारोळ्यात झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू, पतीवर गुन्हा दाखल
सारोळा : पुणे सातारा महामार्गालगत सारोळा (ता.भोर, जि.पुणे) येथे शुक्रवार (दि.१७ नोव्हेंबर) पहाटे पुण्याच्या दिशेने जात असताना कारचालक संतोष तुळशीराम म्हस्के(रा. गुलमार्ग सोसायटी, सिंहगड रोड, पुणे) यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गालगत च्या नाली मध्ये पलटी झाली या अपघातात कारचालक यांची पत्नी स्मिता संतोष म्हस्के (वय ४८वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच संतोष यांचे साडू दिनेश पवार, मेहुणी भाग्यश्री पवार आणि यांची मुलगी मोक्षदा यांस गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनेश पवार व संतोष म्हस्के हे दोघे साडू त्यांच्या पत्नी आणि मुलीसह पुण्याच्या दिशेने जात होते. याबाबत कारमध्ये असलेले कारचालक यांचे साडू दिनेश खंडेराव पवार, (वय ५१ वर्षे, रा.स्वामी समर्थनगर कोर्ट रोड, नंदुरबार) यांनी कारचालक संतोष म्हस्के यांच्या विरुद्ध राजगड पोलीस स्टेशन अंकित किकवी पोलीस चौकी मध्ये याबाबत तक्रार दिली आहे. यात त्यांनी असे म्हणले आहे की, शुक्रवार (दि.१७ नोव्हेंबर) पहाटे ३ च्या सुमारास मी उठलो तेव्हा संतोष यांच्या ताब्यातील वॅगनार कार एम एच १२ के वाय ८६२४ महामार्गालगत असणाऱ्या नाली मध्ये पलटी झाली होती. संतोष म्हस्के यांनी रस्त्याचे व वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने कार भरधाव वेगात चालविलेमुळे त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांच्या ताब्यातील कार ही रस्त्याच्या कडेला असलेल्या डिवायडरला धडकून शेजारीच असलेल्या नालीमध्ये पलटी झालेने हा अपघात झाला आहे. यामुळे आम्हाला झालेल्या दुखापतीस व त्यांची पत्नी स्मिता संतोष म्हस्के (वय ४८वर्षे) यांच्या मृत्यूस ते स्वतः कारणीभूत आहेत.
याबाबत फिर्यादी दिनेश खंडेराव पवार, (वय ५१ वर्षे) यांनी राजगड पोलिस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार राजेंद्र चव्हाण करीत आहेत.