एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांच्या पगारात ६५०० रुपयांची वाढ जाहीर
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांनी मंगळवार(३ सप्टेंबर) पासून संपाची हाक दिली होती. ऐन गणेशोत्सवापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.
पण आता एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेण्याचं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आपला संप मागे घेण्याचं जाहीर केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या या बैठकीत संपावर तोडगा निघाला असून एसटी कर्मचारी संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे.
या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली की, एसटी कर्मचाऱ्यांना जो न्याय अपेक्षित होता तो राज्य सरकारने दिला आहे. सरसकट साडे सहा हजार रुपयांची वाढ मूळ वेतनात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासोबतच एसटी कर्मचारी महिलांना एसटी स्टँडवरील अस्वच्छतेमुळे ज्या समस्यांचा सामना करावा लागतो ही समस्या दूर करण्याचे निर्देश दिले आहेत. एसटी स्टँडवरील सुविधा चांगल्या झाल्या पाहिजेत. एमआयडीसीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खर्च करुन १९३ एसटी डेपोच्या कामाला सुरुवात झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना बैठकीत सहभागी होत्या.