पानशेत धरणाच्या बॅक वॉटर मध्ये पडून ३८ वर्षीय युवकाचा मृत्यू
राजगड : पानशेत धरण (ता.राजगड) बॅक वॉटर परिसरातील कादवे गावच्या स्मशानभूमी जवळ एका व्यक्तीचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी दुपारच्या अडीच सुमारास घडली. उत्तम रावजी पडवळ (वय ३८ वर्ष, रा. कादवे, ता. राजगड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट कळले नसले तरी पाण्यात पाय घसरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
घटनेची माहिती पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टीमला दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य तानाजी भोसले, गणेश सपकाळ ,वैभव भोसले, संजय चोरघे पाटील,संदीप सोळसकर, आकाश सोळसकर , मनोज शिंदे ,प्रतीक महामुनी , सुरज कवडे ,सागर बावळे, यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून वेल्हे पोलिसांच्या ताब्यात दिला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. सदर घटनेचा पुढील तपास वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पंकज मोघे, अजिंक्य बंडगर करीत आहेत.