“माझ्यासाठी ते उपाशी राहिले”; महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या सिकंदरने ‘या’ लोकांना दिलं विजयाचं श्रेय
पुणे : आज माझ्या वडिलांचं माझ्या चुलत्यांचं, महत्वाचं म्हणजे माझे वस्ताद चंद्रकांत काळे आणि आमचे इश्वरदादा हरगुडे, उत्तमदा, योगेश बंबाळे, अस्लमदा यांचं हे यश आहे. हे सगळे माझ्यासाठी खूप राबलेत.
माझ्यासाठी हे सर्वजण पाच दिवस झाले उपाशी आहेत. आज पाच दिवस झाले मी इथं खेळतो आहे. गेल्यावर्षी संधी हुकली होती तेव्हाच मी बोलून दाखवलं होतं की पुढच्या वर्षी मीच मारणार अशा शब्दांत महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर सिकंदर शेख यानं प्रतिक्रिया दिली आहे.
सिकंदर शेख हा मूळचा सोलापूरच्या मोहोळ इथला आहे. तो कोल्हापुरातील गंगावेस तालमीत त्यानं कुस्तीचे धडे गिरवले. वस्ताद चंद्रकांत काळे यांनी त्याला कुस्तीचे धडे दिले. गेल्यावर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याला संधी गमवावी लागली होती. पण यंदा त्यानं महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली आहे.
गेल्यावेळची हुकलेली संधी अखेर सिकंदर शेख यानं पुन्हा खेचून आणत यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा उंचावली. गतवेळचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला केवळ २३ सेकंदातच आस्मान दाखवत त्यानं ही स्पर्धा जिंकली. यानंतर प्रतिक्रिया देताना आपल्या यशाचं श्रेय त्यानं आपल्यासाठी राबलेल्या लोकांना दिलं.