पुणे महापालिकेकडून १३९ वाहने जप्त; शहरातील बेवारस वाहनांवर धडक कारवाई

पुणे : पुणे शहरातील विविध रस्त्यांवर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई सुरु असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. आजपर्यंत १३९ वाहने जप्त करण्यात आली असून, बेवारस वाहनांची माहिती कळवावी असे आवाहन अतिक्रमण विभागाने केले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरातही अनेक ठिकाणी बेवारस वाहने उभी असल्याचे शहरात चित्र दिसत आहे. शहरात १५ वर्षांहून अधिक जुनी झालेली तब्बल एक लाखांहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. नियमानुसार, संबधित वाहनमालकांनी ही वाहने ‘स्क्रॅप’ करणे आवश्यक आहे. ही वाहने ‘स्क्रॅप’ करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने या वाहनांचे मालक ही वाहने घराबाहेर अथवा रस्त्यावरच लावतात. अशी हजारो वाहने शहरातील लहान मोठ्या रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक जागांवर वर्षानुवर्षे धूळ खात उभी आहेत. त्यामुळे या वाहनांचा वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळा होत आहे. तसेच या ठिकाणी साफ सफाई करता येत नसल्याने या भागात दुर्गंधी पसरते, अशा स्वरुपाच्या तक्रारी येत आहेत.

Advertisement

या पार्श्वभूमीवर महापिालकेच्या अतिक्रमण विभागाने बेवारस, नादुरुस्त वाहनांची माहिती, फोटो आणि लोकेशन सह मोबाईल क्रमांकावर पाठवावी असे आवाहन केले आहे. संबंधित वाहनांवर नोटीस लावून ते वाहन सात दिवसांत हलविण्याचे आवाहन केले जाईल. त्यानंतर ते वाहन जप्त केले जाईल. जप्त केलेले वाहन मालकाला एक महिन्याच्या मुदतीत पुन्हा दिले जाईल. त्यासाठी त्यांच्याकडून वाहन हलविण्याचे शुल्क वसूल केले जाईल, असेही अतिक्रमण विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page