कापूरहोळ येथे भाताच्या खाचरात विजेच्या तारेचा धक्का लागल्याने युवकाचा मृत्यू
कापूरहोळ : भोर-कापूरहोळ रस्त्यावरील कापूरहोळ(ता.भोर) गावच्या हद्दीतील भाताच्या खाचरात विद्युत तार पडल्याने त्या तारेतील विद्युत प्रवाहाचा जोराचा धक्का लागल्याने गावातीलच एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. मच्छिंद्र बबन अहिरे(वय ४२ वर्ष) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना आज गुरुवारी(दि. १८ जुलै) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटने बाबत गोरक्षनाथ शांताराम अहिरे यांनी राजगड पोलिसांना खबर दिली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन भोर उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोरक्षनाथ अहिरे यांच्या शेताशेजारीच मयत मच्छिंद्र अहिरे यांची शेती आहे. गोरक्षनाथ हे नेहमी प्रमाणे सकाळी शेतात गेले असता त्यांना शेत जमीन गट नंबर २४६ मधील आंब्याच्या झाडा जवळ मच्छिंद्र अहिरे हे खाली पडलेले दिसले. त्यांच्या हाता मध्ये इलेक्ट्रीक खांबा वरुन खाली पडलेली तार होती, तेव्हा गोरक्षनाथ यांना लगेच जानवले की मच्छिंद्र यांस इलेक्ट्रीक तारेचा शॉक लगलेला आहे. त्यांनी लगेच या घटनेबाबत मच्छिंद्र यांचे सख्खे भाऊ विजेंद्र अहिरे, चुलत भाऊ गणेश अहिरे, शेजारी राहाणार समिर गाडे यांना कळवले. या सर्व जणांनी घटना स्थळी येऊन मच्छिंद्र यांस उपचारासाठी सिध्दीविनायक हॉस्पीटल(नसरापुर, ता. भोर) येथे नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी ते तपासणी पुर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले. सदर घटनेबाबत राजगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.