मुळशीत विजेचा धक्का लागून नऊ गायींसह वासराचा मृत्यू
मुळशी : मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे शेतकऱ्याच्या गोठ्यात घरातील विजेचा प्रवाह उतरून नऊ गायी आणि एका वासराचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गोठ्यात बारा जनावरे होती, त्यात नऊ गायी होत्या. या नऊ गायींपैकी सहा गायी गाभण होत्या. मध्यरात्री पडलेल्या वादळी पावसाने विजेची तार गोठ्यावर पडली होती. रात्रीच्या सुमारास गावातील विद्युत प्रवाह बंद होता. सकाळी विद्युत पूरवठा सुरु झाल्यावर या गायींना विजेचा धक्का लागला. त्यात त्या मृत्यूमुखी पडल्या. त्यापैकी बाहेर असलेली दोन जनावरे सुरक्षित आहेत.
या गाेठ्यास पशुवैद्यकीय अधिकारी यांनी भेट दिली. त्यांनी गायींची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे शेतकरी विनायक शिखरे यांचे बारा लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. या गायींच्या जीवावरच त्यांचा दुग्धव्यवसाय सुरू होता. दरम्यान पशुसंवर्धन खात्याने पंचनामा करून शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुळशीतील शेतकरी करू लागले आहेत.