खोट्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे नोकरी; भोरचे प्रांत डॉ. विकास खरात यांनी पळसोशी गावच्या पोलीस पाटील महिलेला बडतर्फ करण्याचे दिले आदेश
भोर : भोर तालुक्यातील मौजे पळसोशी (ता. भोर) गावाच्या पोलीस पाटीलपदी कार्यरत असलेल्या मंगल नामदेव म्हस्के यांना खोट्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, भोर, डॉ. विकास खरात यांनी त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ केल्याचे आदेश दिले आहेत.
मंगल म्हस्के यांनी पोलीस पाटीलपदी नियुक्ती मिळवताना इयत्ता १० वी उत्तीर्ण असल्याचे खोटे व शाळा सोडल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. अशी तक्रार विनायक अण्णा मस्के यांनी दि.२५ जुलै २०२४ रोजी उपविभागीय कार्यालयात अर्ज देऊन दाखल केली होती. त्यानुसार केलेल्या तपासणीत आदर्श विद्यालय शिरवळ येथील मुख्याध्यापकांनी केलेल्या मुळ अभिलेख पडताळणीनुसार, त्या फक्त इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या प्रमाणपत्रामध्ये “इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेतले व दीर्घकाळ गैरहजर राहिल्याने शाळा सोडली” असा उल्लेख आहे. मात्र, मंगल म्हस्के यांनी हे प्रमाणपत्र बदलून “एस.एस.सी. परीक्षा पास, मार्च १९९५” असे खोटे विवरण नमूद केल्याचे उघड झाले आहे.
तक्रारीच्या आधारे भोर पोलीस स्टेशनमार्फत मंगल म्हस्के यांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, त्यांनी या संदर्भात वेळेवर कोणताही खुलासा सादर केला नाही. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७ अंतर्गत पोलीस पाटीलपदी नियुक्तीसाठी किमान इयत्ता १० वी उत्तीर्ण होण्याची अट अनिवार्य आहे. ही अट मंगल म्हस्के यांनी पूर्ण केली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, शासन फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
डॉ. विकास खरात यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलीस पाटील पदावरील त्यांच्या नेमणुकीपासून ते आजअखेर मिळालेले मानधन वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता, २०२३ अंतर्गत फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्याचे आदेश भोर पोलिसांना देण्यात आले आहेत.
फिर्यातदारांमार्फत गुन्हा दाखल केल्यानंतर याबाबतची कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या कारवाईमुळे स्थानिक स्तरावर खळबळ उडाली असून प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. फसवणूक व भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दिशेने प्रशासनाने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे.