मुळशी तालुक्यातील चिखलगावात पिकवला जातोय थायलंड, मलेशियाचा “निळा तांदूळ”; शेतातच मिळत आहे प्रति किलो २५० रुपये दर

मुळशी : सुगंधी इंद्रायणी तांदळासाठी प्रसिध्द असणाऱ्या मुळशीतील कोळवण खाेऱ्यात आता थायलंड, मलेशिया येथे पिकणाऱ्या निळ्या तांदळाचे उत्पादन होत आहे. मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील चिखलगाव येथील प्रगतशील शेतकरी लहू मारुती फाले यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. या तांदळात अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या या तांदळाला बाजारात सर्वाधिक मागणी आहे. तसेच हा तांदूळ मधुमेह, हृदयरोगासह कॅन्सरसाठी प्रतिरोधक मानला जातो.

Advertisement

हा तांदूळ निळा गडद जांभळ्या रंगाचा असून या औषधी गुणधर्माच्या तांदळास मोठी मागणी होत आहे. या तांदळामध्ये लोह, झिंक, कॅल्शियम, फायबर तसेच अँटिऑक्सिटेन्ट मोठ्या प्रमाणात असून मधुमेह, हृदयरोग तसेच कॅन्सरला प्रतिरोधक आहे. साधारणत: एक एकरमधून सोळाशे किलो उत्पादन मिळते व प्रति किलो २५० रुपये या दराने तांदूळ ग्राहक शेतात येऊन खरेदी करीत आहेत. कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने असे तांदळाचे उत्पादन होत आहे. या वाणाची उंची साधारणत: सात फुटांची असते. त्यामुळे पेंढाही जास्त मिळतो. कमी पावसात व हलकी किंवा मुरमाड जमिनीमध्ये याचे उत्पादन चांगले निघते. या वाणाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने कोणतेही रोग या पिकावर पडले नाहीत, पिकाचा कालावधीही १२० दिवसांचा आहे. हा तांदूळ पिकवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे, कृषी सहायक शेखर विरणकर यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे लहू फाले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page