भोंगवली देवडजाई धरणावरून चोरांनी “हॅट्ट्रिक” करत तिसऱ्यांदा केली कॉपर केबलची चोरी; शेतकरी चिंताग्रस्त
कापूरहोळ प्रतिनिधी: तुषार सणस
सारोळा : भोर तालुक्यातील भोंगवली येथे तिसऱ्यांदा पाण्यातील मोटरी साठी वापरात असलेली कॉपर केबल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.पूर्व भागात केबल चोरीची घटना ही एका पाठोपाठ एक होत असल्याने शेतकऱ्यांना चोर परिसरातील असल्याचा संशय आला आहे. या घटने संदर्भात राजगड पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पूर्व भागात एका पाठोपाठ एक गावामध्ये कॉपर केबल चोरीला जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहे.कॉपर केबल पुन्हा पुन्हा चोरी जात असल्याने शेतकऱ्याच्या खिशाला वारंवार कात्री लागत आहे. भोंगवली गावातील दि.८ डिसेंबर रोजी मध्यरात्री तेरा शेतकऱ्यांच्या केबल तिसऱ्यांदा चोरीला गेल्या आहेत. या मुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर चोर धरणा शेजारीच असलेल्या मंदिराच्या परिसरात केबल सोलत त्यामधील कॉपर वेगळी करत असल्याची चर्चा पारावर रंगत आहेत.या मुळे राजगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन धरण परिसरात पाहणी करून काही सुगावा लागतो का ? याची शहानिषा करणे गरजेचे आहे.
भोंगवली देवडजाई धरण येथून काळ्या रंगाची कॉपरची केबल त्याची किंमत प्रती ५० रु मिटर असून सगळ्या शेतकऱ्यांच्या एकूण (९० मिटर केबल) ६१५०० रुपये किमतीची कॉपर केबल चोरी झाल्याची मुख्य तक्रार संजय किसन शेडगे (वय ५८ वर्ष. धंदा शेती रा.भोंगवली, ता. भोर जि. पुणे) यांनी व इतर बारा शेतकऱ्यांनी राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किकवी चौकी येथे केली आहे. तर आता या शेतकऱ्यांच्या चोरी नंतर राजगड पोलीस कोणत्या प्रकारे या घटनेचा तपास करणार आहेत? आणि चोर पोलिसांना सापडतात का? या कडे सर्व शेतकरी व ग्रामस्थ यांचे लक्ष लागले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार राजेंद्र चव्हाण करीत आहेत.