भोर येथे खरेदी-विक्री संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचदिवसीय शेतकरी कृषी प्रदर्शनास आज पासून सुरुवात
भोर : आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे व उपाध्यक्ष अतुल शेडगे यांच्यासह सर्व संचालकांनी नियोजित केलेल्या अनंत-निर्मल शेतकरी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदेश काँग्रेसच्या महिलाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते आज रविवारी (दि.१७ डिसेंबर) करण्यात आले. भोर पोलिस ठाण्याच्या मैदानावर सुरु झालेले हे प्रदर्शन पुढील पाच दिवस सुरू राहणार आहे.

प्रदर्शनात सोमवारी (दि. १८) सायंकाळी महाराष्ट्राची लोकधारा, मंगळवारी (दि.१९) होम मिनिस्टर, बुधवारी (दि.२०) शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य स्पर्धा आदी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. याखेरीज दररोज चिमुकल्यांसाठी बालजत्रा, खाद्यजत्रा, शॉपिंग मॉलही असणार आहेत. याशिवाय पशू-पक्षी प्रदर्शनात कमी उंचीची आणि जास्तीत जास्त दूध देणारी पुंगनुरु गाय व ओडिश जातीचा नंदी ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी पारितोषीक वितरणाने प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी, राजगड ज्ञानपीठाच्या सचिव स्वरूपा थोपटे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.एस.मडके, जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, महिलाध्यक्षा गीतांजली शेटे, माजी सभापती लहू शेलार, वारकरी संघटनेचे आर. के. रांजणे, धनंजय वाडकर, गिता आंबवले, कृष्णाजी शिनगारे, बाजार समितीचे अध्यक्ष आनंदराव आंबवले आदी प्रमुख मान्यवरांसह शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.