भोर – गुंजवणी नदीच्या बंधाऱ्याखाली आढळला हातवे खु. येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ग्रामस्थांकडून वर्तविला जातोय घातपाताचा संशय ?

नसरापूर : रात्रीच्या सुमारास घरी परतत असणाऱ्या हातवे खु.(ता. भोर) येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हातवे बु. येथील गुंजवणी नदीच्या बंधाऱ्याखाली आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. गणपत गेनबा खुटवड(वय ५२ वर्ष, रा. हातवे खु., ता. भोर) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून राजगड पोलीस ठाण्यात आज सोमवारी(दि. २३ सप्टेंबर) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत संदिप अरुण खुटवड(वय ४० वर्ष, रा. हातवे खु. ता. भोर) यांनी खबर दिली आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी(दि. २२ सप्टेंबर) रात्री साडे अकराच्या सुमारास खबर देणार संदीप खुटवड यांना माहिती मिळाली की, मयत गणपत खुटवड यांची मोटारसायकल ही हातवे बु. येथील बंधाऱ्याच्या सुरक्षा कठड्याला लटकताना दिसत आहे. त्यानंतर संदीप खुटवड यांनी नातेवाईक व गावातील काही ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोचल्यावर त्यांना मयत गणपत खुटवड हे बंधाऱ्याच्या खालच्या बाजुस नदी पात्रात बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. यावेळी त्यांच्या डोक्यास मार लागून त्यामधून रक्त येत होते.

Advertisement

यादरम्यान नातेवाईकांनी आजुबाजुस शोध घेतला असता त्यांची मोटारसायकल ही रोडच्या सुरक्षा कठड्याला लटकत असताना दिसली. तसेच त्यांचा मोबाईल व चष्मा रोडच्या पश्चिम बाजुस नदिपात्राच्या उतारावर एकाच जागी मिळून आला. त्यापासुन काही अंतरावर विष्ठा केल्याचे दिसून येत आहे. मयत खुटवड यांच्या पायातील एक चप्पल ही त्याच ठिकाणापासुन पाण्याच्या जवळ मिळुन आली आहे. यादरम्यान मयत गणपत खुटवड यांना उपजिल्हा रुग्णालय भोर येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर घटने बाबतचा अधिक तपास राजगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page