भोर तालुक्यातील वेळू येथील २९ वर्षीय युवक बेपत्ता
खेड शिवापूर : वेळू (ता.भोर, जि.पुणे) येथील सुफियान मुस्ताक मुजाहीद (वय २९ वर्षे) हा युवक बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची आई नाहीदा मुस्ताक मुजाहीद यांनी राजगड पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाहीदा मुजाहीद यांचा मुलगा सुफियान हा कोंढणपुरफाटा (ता. हवेली, जि.पुणे) येथून हिरव्या रंगाची ॲक्टीव्हा घेऊन कोणास काहीही न सांगता शुक्रवारी (१५ डिसेंबर) रोजी कोठेतरी निघुन गेला. तो अजून घरी परतलाच नाही. त्याचा आजूबाजूच्या परिसरात, इतर नातेवाइकांकडे तसेच त्याच्या मित्रांकडे शोध घेतला असता तो सापडला नाही. यावरून तो बेपत्ता असल्याची तक्रार राजगड पोलिस ठाण्यात आज रविवार (दि. १७ डिसेंबर) रोजी दाखल करण्यात आली आहे.
सदर युवकाचे वर्णन पुढीलप्रमाणे
उंची ५.६ फूट, अंगाने मध्यम, रंग सावळा, चेहरा गोल, अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पँट आणि सोबत हिरव्या रंगाची ॲक्टिवा गाडी क्र. एम एच १४/६९७१.
वरील वर्णनाचा युवक कोणाला दिसल्यास वा आढळून आल्यास राजगड पोलिसांशी त्वरित संपर्क करावा असे आवाहन पोलीस अंमलदार राहुल कोल्हे यांनी केले आहे.