भोर विधानसभेत आमदार महायुतीचाच होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुळशी : आगामी विधानसभा निवडणुकीत भोर विधानसभेत आपला विजय निश्चित आहे. येथील आमदार हा महायुतीचाच होणार असून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबई येथे पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख व मुळशीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते भरत गोगावले, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, मनीषा कायंदे तसेच भोर, राजगड(वेल्हा), मुळशी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भोर, राजगड(वेल्हा), मुळशी तालुक्यांच्या विकासासाठी भरघोस निधी मंजुर झालेला आहे. आगामी काळातही अधिक निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी ताकद दिल्यामुळे भोर, राजगड(वेल्हा), मुळशी तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भोर विधानसभेत मुळशीचे मतदान हे निर्णायक ठरणार आहे. केलेल्या कामाचा कार्य अहवाल मुळशीतील प्रत्येक घरोघरी पोचविला जाणार आहे. आगामी निवडणुकीसाठी केलेल्या कामाचा फायदा होणार असल्याचे चांदेरे यांनी यावेळी सांगितले.