पुणे-सातारा महामार्गा लगतच्या गावांमधील दुकाने फोडणाऱ्या टोळीतील एकाला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
नसरापूर : भोर तालुक्याच्या पुणे-सातारा महामार्गा लगतच्या गावांमध्ये गुरुवार (दि.५ नोव्हेंबर) रोजी एकाच रात्री चोरट्यांनी चार दुकाने फोडून रोकडसह मुद्देमाल चोरून नेला होता. यातील एका दुकानात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यांनतर शुक्रवारी (दि. १३ डिसेंबर) राजगड पोलीस हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार अमोल शेडगे व मंगेश भगत यांना गोपनीय माहिती मिळाली की, वरील चोरींमधील व तीन महीनन्यांपुर्वी नसरापुर (ता.भोर) येथील मधुशाला बियर शॉपीचे शटर फोडून रोकड चोरून नेणाऱ्यांपैकी एक आरोपी नसरापुर-चेलाडी फाटा ब्रिज खाली थांबला आहेे. यानंतर पोलिसांनी त्यास सापळा रचून ताब्यात घेतले. करण अजय हुंबे (वय १९ वर्ष, रा. धायरी, ता. हवेली) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
त्यानंतर करण हुंबे यास राजगड पोलीस ठाण्यात आणून सखोल तपास केला. यावेळी हुंबे याने सांगितले की, त्याने व त्याचे सोबतचे मित्र राहुल संजय दारवटकर, रोशन राजु लांडगे व लक्ष्मण राम परिवार (सर्वजण राहणार धायरी, ता. हवेली) यांनी मिळून वरील सर्व चोऱ्या केल्या असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहीते, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस हवालदार अमोल शेडगे, राजू मोमीन, तुशार भोईटे, रामदास बाबर, मंगेश भगत तसेच राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, अक्षय नलावडे, मंगेश कुंभार यांनी केली आहे.