धक्कादायक! साताऱ्यातील मान तालुक्यात माय लेकीचा गळा आवळून निर्घृण खून
सातारा (प्रतिनिधी) : माण तालुक्यातील पर्यंती या गावातील माय लेकींचा बुधवारी (२०डिसेंबर) रात्री अज्ञाताने गळा आवळुन खुन केल्याने संपूर्ण माण तालुका या दुहेरी हत्याकांडाने हादरला असून हत्याकांड घडलेल्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देत मृतदेहाची पाहणी करुन संबधित आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची वेगवान सुत्रे हालवत याठिकाणी श्वान पथकासही पाचारण केले, तर या प्रकरणातील आरोपींचा पोलीसांनी तात्काळ छडा लावावा अशी मागणी, माणवासीयातुन होत आहे.
पर्यंती ता. माण येथील संपदाबाई लक्ष्मण नरळे (वय ७५ वर्षे) व नंदाबाई भिकू आटपाडकर (वय ५८ वर्षे) अशी माय लेकीची नावे आहेत. या दोघी एकत्र रहात असून त्यांचे गावातच एक छोटे किराणा दुकान आहे. गावातील सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबध असून दोघीही विधवा आहेत. संपदाबाई यांना तीन मुली व दोन मुले आहेत एक मुलगा पुण्यात नोकरी करत असून एक पर्यंती गावातच वेगळा राहून शेती करत आहे. तसेच नंदाबाई यांना मुलबाळ नसून सावत्र दोन मुले आहेत ते घरापासून काही अंतरावर राहतात.
आज सकाळी गुरुवार (दि २१ डिसेंबर) रोजी सकाळी ७ वाजता नंदाबाई यांची नात भारती दाजीराम नरळे (वय १८ वर्षे) किराणा दुकानात सामान घेण्याठी आली असता तिला दुकानाचे शटर थोडे उघडे दिसले तीने आजीला हाक मारली असता कोणीच आवाज देत नाही हे पाहिल्यावर तीने घराचे दार ढकलले असता दोन्ही मायालेकी समोरच मृतअवस्थेत दिसून आल्या. ही घटना पोलीस पाटील यांना सांगीतली. पोलीस पाटील यांनी या घटनेची खबर त्वरीत म्हसवड पोलीस ठाण्याचे एपिआय शिवाजी विभूते यांना दिली. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक रवी डोईफोडे यांनी या घटनेची खबर कोरेगावचे प्रभारी उपविभागीय अधिकारी व दहिवडी विभागाचे प्रभारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना देत ते सकाळी ७ वाजता सर्व फौज फाट्यासह घटना स्थळी हजर झाले घटनेचे गांभीर्य ओळखून स्थनिक गुन्हे शाखा, श्वान पथक, फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले. तर श्वानपथकाने पर्यंती गावापासून दोन कि.मी. अंतरावरील मुल्ला वस्तीपर्यंत मार्ग दाखवून परत आले. खुनाचे कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.