पिंगोरी(पुरंदर) येथे बिबट्याकडून कालवडीचा फडशा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सासवड(प्रतिनिधी) : पिंगोरी (ता. पुरंदर) येथील हनुमंत महादेव यादव यांच्या पिंगोरी धरण परिसरातील शेतातील गोठ्यातील कालवडीवर बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला. परिसरामध्ये बिबट्याची पुन्हा दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील काही दिवसांपासून, पिंगोरी परिसरातील शेळ्या- मेंढ्या, जनावरे चरण्यासाठी डोंगर परिसरात फिरताना काहींनी बिबट्या पाहिला असल्याची चर्चा होती. दरम्यान, हनुमंत यादव यांच्या शेतातील गोठ्यातील दोन वर्षे वयाच्या कालवडीचा बिबट्याने फडशा पाडल्याने यादव यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभाने बिबट्याचा बंदोबस्त करून, नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी हनुमंत यादव यांनी वनविभागाकडे केली आहे.
भुजबळ कामठवाडी, तसेच वाल्हे-मांडकी रस्त्यालगत मागील काही दिवसांपासून बिबट्या दोन बछड्यासह वावरताना काहींच्या निदर्शनास आले असल्याने या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.वनविभागाच्या कर्मचार्यांनी प्रत्यक्षात पाहणी करून फोटो व खबरदारी कशी घ्यायची यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर पाठविण्यात आला असून खबरदारी घेण्याचे आवाहन परिसरातील नागरिकांना वनविभागाकडून करण्यात आले आहे.