शेती करण्याचा लेकीचा हट्ट पुरवला; पुण्यात बाप-लेकीच्या शेतीची चर्चा!

पुणे : अलीकडे शेती परवडत नाही, आता शेतीत काही राहिले नाही असे ऐकायला मिळते. मात्र हल्ली सुशिक्षित तरुणच नाही तर अनेक तरुणी देखील शेती क्षेत्राची वाट धरत आहे. इतकेच काय तर चित्रपट-सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते-अभिनेत्रींना देखील शेतीची भुरळ पडत असल्याने, शेती खरेदी करत ते निसर्गाच्या सानिध्यात येऊन आनंदाने शेतात काम करत असल्याच्या चर्चा सतत माध्यमांमध्ये होत असतात. आज आपण अशाच एका चित्रपट क्षेत्रात काम करण्याऱ्या तरुणीची यशोगाथा पाहणार आहोत. या तरुणीने पुणे जिल्ह्यात शेती खरेदी करत, माळरान जमिनीला बहरून टाकले आहे.

पुण्यातील जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे जवळील भालसिंगवाडी या गावात स्नेहा राजगुरू या तरुणीने शेती खरेदी केली आहे. वडील अनिल राजगुरु यांच्या मदतीने स्नेहाने ‘फार्माकल्चर बाप बेटी फार्म’ या नावाने ही शेतीची फुलवली आहे. त्यामुळे या शेतीची सध्या सर्वत्र चर्चा होत असून, या ठिकाणी अगदी माळरानावर मातीची कमतरता असताना देखील उत्तम पिके घेतली जात आहे. त्यामुळे या बाप-लेकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

चित्रपट क्षेत्रात काम करणारी स्नेहा विविध ठिकाणी फिरायची. त्यातून तिला फार्माकल्चरची आवड निर्माण झाली. तिने अशाच एका फार्मला भेट दिली होती. त्यावेळी तिच्याही मनात स्वतःचे फार्म सुरु करण्याचा विचार आला. तिने याबाबात आपल्या वडिलांना कल्पना दिली. संपूर्ण बालपण, शिक्षण शहरात गेले. त्यामुळे शेतीचा कोणताही गंध नाही. मात्र चित्रपट क्षेत्रात काम करत असताना देखील मुलीच्या शेतीच्या आवडीमुळे वडिलांनी उजाड माळरानावर शेती घेत लेकीचा हट्ट पुरवला. आणि मुलीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपड सुरु केली. त्यांच्या याच कल्पकतेतून आज एक भन्नाट फार्म उभा राहिला आहे. त्याचे नाव त्यांनी फार्माकल्चर बाप बेटी फार्म”. असे ठेवले आहे.

Advertisement

सध्या स्नेहा आणि तिचे वडील अनिल राजगुरू हे या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आणि अन्य पिके घेत आहे. अनेक आयुर्वेदिक झाडांची लागवड त्यांनी केली आहे. याशिवाय केळी, पपई आणि अन्य फळ झाडांची लागवडही त्यांनी आपल्या शेतीमध्ये केली आहे. फार्माकल्चर म्हणजे जंगलात पिके एकमेकांच्या मदतीने वाढतात. याच संकल्पनेचा आधार घेत स्नेहा हिने खाद्यपदार्थांपासून ते औषधी वनस्पतींपर्यंत सर्व पिकांची लागवड तिने आपल्या शेतात केली आहे. आपल्या या शेतीचे स्नेहा हिने कप्पे तयार केले असून, जमिनीवर माती कमी असल्याने नियोजित पद्धतीने पिकांची लागवड तिने केली आहे. सर्व पालेभाज्या, टोमॅटो, भोपळा आदी पिकांचाही यात सामावेश आहे.

स्नेहा हिने एक हजाराहून अधिक प्रकारची भाजीपाला, फुले, फळपिके आणि अन्य पिकांची लागवड आपल्या शेतात केली आहे. २०२२ पासून तिने आपल्या शेतीमध्ये फळझाडांची लागवड केली असून, आज ही फळ झाडे चांगली बहरू लागल्याने आपल्याला शेतात आल्यानंतर एक आत्मिक शांतता लाभत आहे, असे स्नेहा शेवटी सांगते. तिच्या या फार्मला देश-विदेशातील पर्यटक भेट देत असल्याचे ती सांगते. नव्याने शेतीची क्षेत्रात येऊन फार्माकल्चरची वाट धरणाऱ्या तरुण-तरुणींसाठी स्नेहाचा हा ‘फार्माकल्चर बाप बेटी फार्म’ नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page