पुणे-सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हद्दीत अल्कोहोल वाहतूक करणारा टँकर पलटी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे(ता. भोर) गावच्या हद्दीत आज मंगळवारी(दि. २३ एप्रिल) पहाटे ३ वाजता अल्कोहोल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे गावच्या हद्दीत सांगली इस्लामपूर राजारामबापू साखर कारखान्यावरून एक्साईज पोलीस यांच्यासोबत अल्कोहोल घेऊन पुण्याच्या दिशेने चाललेला टँकर(एम एच ४८ बी एम ४१३२) शिवरे गावच्या हद्दीतील हॉटेल तृप्ती समोरील वळणावर पलटी झाला. टँकर वरील चालक शंकर शिंगाडे त्यांच्यासोबत एक्साईजचे कर्मचारी व कॉन्स्टेबल संजय जाधव असे तिघेजण पुण्याच्या दिशेने जात असताना आज मंगळवारी(दि. २३ एप्रिल) रोजी पहाटे ३ च्या दरम्यान टँकर चालक शिंगाडे यांचे टँकर वरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून टँकर चालक व एक्साइज पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस व महामार्ग पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील टँकर काढण्यासाठी त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी चार क्रेन आणि अग्निशामक दल दाखल झाले आहेत. या घटनेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली असून वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे पुणे आणि सातारा या दोन्ही बाजूने प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडी कधी सुटेल याचा अंदाज अद्याप येऊ शकलेला नाही.