खंडाळा तालुक्यातील गुठाळे येथे दहा दिवसांपूर्वी आढळलेल्या युवतीच्या कवटी आणि इतर अवशेष प्रकरणी सख्ख्या भावाला अटक; खुनी निघाला सख्खा भाऊ !
शिरवळ : गुठाळे येथील युवतीच्या खुन प्रकरणी युवकाला अटक करण्यात आली असून शिरवळ पोलीसांच्या धडाकेबाज कारवाईत शिरवळ पोलीसांनी कवटीवरुन शोध घेत सख्ख्या भावाच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी केवळ १० दिवसात गुन्हा उघडकीस आणला. मौजे गुठाळे (ता. खंडाळा) येथील गट नंबर २३७ मध्ये १६ डिसेंबर रोजी मानवी हाडांचे अवशेष शिरवळ पोलिसांना आढळून आले होते. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्यात अकस्मात मयत दाखल करण्यात आलेले होते. घटनास्थळाची पाहणी करता घटना स्थळाच्या आजू-बाजूस मिळून आलेले लेडीज सॅन्डल, कपडयांची बॅग व त्या मधील खाजगी कंपनीचा गणवेष यावरुन मिळालेले साहित्याची ओळख पटली.
नातेवाईकांचा शोध घेवून मानवी हाडांचे अवशेष हे शिरवळ येथील मयत युवती मनिषाकुमारी जिमदार महतो (वय १९ वर्षे मुळ रा. मांझी मियापट्टी माझी सारन जि. छपरा राज्य बिहार.हल्ली रा. शिरवळ ता खंडाळा जि. सातारा) हिचे असल्याचे तिचे नातेवाईकांनी ओळखले. यावेळी सदरील घटना ही घातपात असण्याची शक्यता गृहीत धरुन शिरवळ पोलीसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार विविध अंगाने तपास करण्यास सुरुवात केली.
यावेळी घटनास्थळाची परिस्थितीवरून संबंधित युवतीचा घातपात असण्याची शक्यता गृहीत धरुन शिरवळ पोलिसांनी तपास केला. दरम्यान, मनिषाकुमारीचे गावातील युवकाबरोबर प्रेमसंबंध असल्याने भाऊ शंकर महतो यानेच गळा आवळून खून केल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले.
त्यानुसार नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, सतीश आंदेलवार, पोलीस अंमलदार संजय धुमाळ, जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुरेश मोरे, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर, सुरज चव्हाण यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करीत सदरील गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
याप्रकरणी युवतीचा भाऊ शंकर जिमदार महतो (वय २४, मूळ रा. माझीनियापत्ती ता. माझीसारन जि. छपरा रा. बिहार सध्या रा. पळशी ता. खंडाळा) याला शिरवळ पोलीसांनी अटक केली असून यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे काय या बाबतचा तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.या घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे अधिक तपास करीत आहे.