पुणे जिल्हा बॅंक भरती प्रक्रियेत गौडबंगाल? एका विशिष्ठ संस्थेमार्फत भरतीच्या हट्टापायी भरती लांबल्याची चर्चा
पुणे : राज्यातील नामांकित आणि अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने अर्थात पीडीसीसी बॅंकने लेखनिक पदासाठी अर्ज मागविले.
मात्र, विशिष्ट संस्थेद्वारे भरती प्रक्रिया राबविण्याच्या हट्टामुळे गेल्या दोन वर्षांपासून ही परीक्षा रखडली आहे. अर्ज भरुनही अजून परीक्षेची तारीख निश्चित नाही, यावरुन अर्ज केलेल्या उमेदवारांकडून पीडीसीसी बॅंकेच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे, त्यांच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तरे देणे टाळले जात असल्याने बॅंकेच्या या प्रक्रियेतील गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा बॅंकेने जुलै २०२१ मध्ये लेखनिक पदाच्या ३५६ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली. या परीक्षेसाठी तब्बल ३१ हजार उमेदवारांनी अर्ज भरले. परीक्षेसाठी बॅकेकडून एका खासगी एजन्सीची नियुक्ती केली. दरम्यान, राज्य शासनाने सहकारी बॅंकांमधील नोकरभरती प्रक्रिया फक्त ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचे आदेश दिले. तसेच, सहकार आयुक्तांनी तयार केलेल्या अधिकृत एजन्सी पॅनेलमधील संस्थेकडेच नि:पक्ष व पारदर्शक पध्दतीने परिक्षा घेऊनच नोकरभरती करावी, अशा सूचना शासनाने दिल्या, असे असतानाही एका खासगी एजन्सीमार्फतच भरती प्रक्रिया राबविण्याचा हट्ट जिल्हा बॅकेने धरला. एका विशिष्ठ संस्थेमार्फत भरती प्रक्रियेच्या हट्टापायी ही भरती प्रक्रिया लांबल्याची चर्चा उमेदवारांमध्ये सुरु आहे. कोणाच्या तरी सुगीच्या दिवसांसाठी हजारो उमेदवारांना का वेठीस धरले जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा बॅंकेवर मागील अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असून बॅंकेवर त्यांचीच सत्ता आहे. त्यांच्याच बॅंकेकडून भरती प्रक्रियेसंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून निर्णय होत नाही. त्यामुळे याप्रश्नी उपमुख्यमंत्री पवार यांनी लक्ष घालून लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.
जिल्हा बॅंकेने लेखनिक पदाच्या ३५६ जागांसाठी अर्ज मागविले
– ३५६ जागांसाठी सुमारे ३१ हजार प्राप्त
– एका अर्जासाठी परिक्षा शुल्क ८८५ रुपये
– याप्रमाणे बॅंकेकडे २ कोटी ७४ लाख ३५ हजार इतकी रक्कम जमा
लेखनिक पदाच्या या भरती प्रक्रियेसंदर्भात संचालक मंडळ आणि सहकार विभागाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
– डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक