वाईत शासकीय कर्मचारी संतप्त, कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू! शासकीय कामावर होणार विपरीत परिणाम!
वाई : वाई तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या संपामुळे तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील यंत्रणा ठप्प झाली असून डोंगर, दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थी आबालवृद्धांसह शेतकऱ्यांची कामे अडकून पडणार आहेत.
प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावेत यासाठी सततचे प्रयत्न या संघटनांकडून झाले. त्यामधे सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करु नका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या वगैरे मागण्या दिर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षक कमालीचे संतप्त आहेत.
राज्य सरकारने या बेमुदत संपाचा विचार करुन लवकर मध्यस्थी करून जनतेला न्याय द्यावा अशी मागणी आता नागरिक करीत आहेत.वाई तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन आपल्या मागण्यांचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पोहचविण्यासाठी वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे दिले.