दुय्यम निबंधकाच्या सतर्कतेमुळे फसला बनावट खरेदीखताचा डाव
शिक्रापूर(प्रतिनिधी) : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट महिला उभी करुन जमिनीच्या खरेदीखताचा डाव प्रभारी दुय्यम निबंधकाच्या सतर्कतेने फसल्याचे समोर आले. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश लक्ष्मण भंडारी, विवेक गौतम कांबळे, किसन पां.मोहिते, श्रीपाद जमनाप्रसाद बघेल, अमित रविकिरण गायकवाड यांच्यासह एका बनावट महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नियमितपणे जमिनींच्या दस्त नोंदणीचे कामकाज सुरु असताना काही लोक व एक महिला बाभूळसर खुर्द येथील एका जमिनीचे खरेदीखत करण्यासाठी आलेले होते. यावेळी जमीन मालक असलेली राजश्री नागेश भंडारी ही महिला गणेश लक्ष्मण भंडारी याला तिची जमीन विक्री करीत असल्याचे दस्त बनवून चार साक्षीदार असल्याबाबतचे दस्त बनवत सर्वांच्या सह्या घेण्यात आलेल्या होता.
दरम्यान, प्रभारी दुय्यम निबंधक अनंत भुजबळ यांच्यासमोर सह्यांची व अंगठ्याची पडताळणी होत असताना जमीन मालक असलेल्या महिलेला नाव विचारल्यानंतर तिने चुकीचे नाव सांगितले. महिलेसह ती व्यक्ती देखील गोंधळळ्याचे भुजबळ यांच्या लक्षात आल्याने त्यांनी महिलेने दिलेले ओळखपत्र पाहिले. ओळखपत्रावरील महिलेचा फोटो व समोर असलेल्या महिलेमध्ये तफावत असल्याचे अनंत भुजबळ यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच नोंदणी थांबवत त्याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले.
याबाबत तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयाचे प्रभारी दुय्यम निबंधक अनंत रमेश भुजबळ (रा. बाफना मळा, शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.