धक्कादायक! मांढरदेवी घाटात पतीनेच केला पत्नीचा खून, २ महिन्यांपासून पत्नी बेपत्ता असल्याचा बनाव करणाऱ्या पतीस पोलिसांकडून अटक
वाई (प्रतिनिधी) : कौटुंबिक वादामुळे व सोडचिठ्ठी देत नसल्याच्या रागातून पत्नीचा मांढरदेवी-वाई घाटात खून करुन मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणीकंद पोलिसांकडे दिली होती. पोलिसांनी तपास करुन पत्नीचा खून करणाऱ्या व बेपत्ता असण्याचा बनाव करणाऱ्या पतीला अटक केली आहे. ही घटना २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी आठ ते दोन दरम्यान वाई तालुक्यातील मांढरदेवी-वाई रोडवरील घाटात घडली होती.
या प्रकरणी अमोलसिंग मुरली जाधव (वय २६ वर्षे, रा.फुलगांव, ता. हवेली) यांस लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. ललिता अमोलसिंग जाधव (वय ३८ वर्षे, रा.फुलगांव, ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार प्रकाश नारायण आव्हाळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १४ जानेवारी २०२४) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाने मोठी असल्याने तसेच घरच्यांच्या व नातेवाईक यांच्या दबावामुळे आरोपीने मयत ललिता हिच्यासोबत लग्न केले होते. लग्नानंतर त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. तसेच ललिता आरोपीला सोडचिठ्ठी देण्यास तयार नव्हती. याच कारणावरून आरोपीने पत्नीला संपवण्याचा प्लॅन केला. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपीने पत्नीला मांढरदेवी येथे दर्शनासाठी जायचे असल्याचे सांगून तिला मांढरदेवी येथे घेऊन गेला.
दर्शनासाठी जात असताना आरोपीने घाटात कार थांबवून चालकाला मंदिराजवळील पार्कींगमध्ये कार लावून तिथेच थांबवण्यास सांगून ते दोघे घाटातून मंदिराच्या दिशेने पायी चालत गेले. चालत जात असताना रस्त्यात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने पत्नी ललिता हिला उतारावरुन दरीत ढकलून दिले. मात्र, पत्नी २० फूट अंतरावर असलेल्या झाडाझुडपात अडकली. आरोपीने खाली उतरून झाडाझुडपात अडकलेल्या पत्नीचा साडीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरवा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह डोंगर उतारावरुन ढकलून दिला.
यानंतर आरोपीने लोणीकंद पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी बेपत्ता महिलेचा तपास करत असताना आरोपीने तिचा खून करुन मृतदेह डोंगर उतारावरुन फेकून देऊन पुरावा नष्ट केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी अमोलसिंग जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे करीत आहेत.