पेंजळवाडी (भोर) येथे धर्मप्रेमींनी केला हिंदूसंघटन करण्याचा निर्धार
सारोळा : राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बाळकडू दिले आणि तसे संस्कार त्यांच्यावर करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. अगदी त्याचप्रमाणे पुन्हा एकदा हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपण मावळे बनूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे नागेश जोशी यांनी केले. राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने श्री मारुति मंदिर, पेंजळवाडी(ता. भोर, पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या सभेला एकूण २०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समितीचे मनीष चाळके यांनी केले.
सभेच्या स्थळी पोवाडे, तसेच भगवे झेंडे लावून सभेचे आयोजन उत्तमरित्या केले होते, त्यामुळे पूर्ण गावातील वातावरण उत्साहवर्धक झाले होते. पेंजळवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग घेण्यात आला. तसेच न्हावी (ता.भोर) येथील प्राध्यापक राहुल सोनवणे यांनी सेवेतील साधकांच्या महाप्रसादाची व्यवस्था केली होती. वर्गात येणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व धारकरी यांनी सभा यशस्वी होण्यासाठी कृतीशील सहभाग घेतला होता.