राजगड(वेल्हे) तालुक्यात पावसाचा हाहाकार, भट्टी खिंड रस्ता पाण्याखाली; तोरणा किल्ल्याच्या पाश्चिम विभागातील १८ गाव मावळ विभागाचा संपर्क तुटला
राजगड : राजगड(वेल्हे) तालुक्यात पावसाने हाहाकार उडविला असून संपूर्ण भागात ढगफुटीसदृश पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. तालुक्यातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत असून सगळी कडे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या दरम्यान तालुक्यातील भट्टी खिंड रस्ता हा पाण्याखाली गेल्यामुळे तोरणा किल्ल्याच्या पाश्चिम विभागातील १८ गाव मावळ विभागाचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने शेजारी असलेल्या ओढ्यात अचानक मातीचा मोठा ढिगारा आल्याने ओढा बंद होऊन ओढ्यातील संपूर्ण पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले आहे. त्यामुळे नक्की रस्ता कुठे आहे? याचा अंदाज स्थानिक नागरिकांना लावणे कठीण झाले आहे.
यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. परंतु या रस्त्यावरून जाणाऱ्या जाधववाडी, नळवट, पासली, माजगाव, शेनवड, बालवड, वरोती बु., वरोती खु., कोलंबी, केळद, भोरडी, निगडे, कुंबळे, हारपुड, सिंगापूर, गृहिणी या गावांचा संपर्क यामुळे तुटला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतुकीसाठी रस्ता पूर्ववत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
तोरणा गडाच्या पश्चिम विभागातील १८ गावांना जोडणारा रस्ता दुरुस्ती व पुनर्निर्मिती साठी कोट्यावधी रुपये निधी खर्च झाला आहे व पुन्हा नव्याने मंजूर आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुस्त अधिकारी व मुजोर ठेकेदार यांनी संपुर्ण उन्हाळ्यात निधी मंजूर असतानाही भट्टी खिंडीचे काम न केल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या सामान्य माणसांच्या जिवाशी खेळ करणार्या ठेकेदार व अधिकार्यांवर कडक कारवाई करावी व ठेकेदार काळ्या यादीत टाकावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
– दत्ता देशमाने(मा. तालुकाप्रमुख शिवसेना राजगड(वेल्हे))