फलटण भूमीअभिलेख कार्यालयातील लाचखोर लिपिक रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
फलटण : फलटण तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इब्राहिम मोहम्मदशफी मुलाणी (वय ४९, रा. हिरवे बुद्रुक, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा. खेड, जिल्हा पुणे) यास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवारी (२९ जानेवारी) सात हजार रूपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाणी याने कोरेगाव (ता. फलटण) येथील तक्रारदारास मोजणी हद्द कायम करण्याकरीता दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. ती रक्कम न दिल्याने संबंधित अधिकारी काम टाळाटाळ करत होते. म्हणून संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांना कॉल करून ही बाब सांगितली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दहा हजार रूपये लाचेची मागणी केल्यापैकी त्यातील सात हजार रुपये रक्कम मौजे कोरेगाव ता. फलटण येथील तक्रारदार यांचे मोजणी गटाचे शेजारी स्वीकारली असता त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याकडून रंगेहाथ पकडण्यात आले.
फलटण तालुयातील लाचलुचपत विभागाची आठवडाभरात ही दुसरी कारवाई असल्याने राज्य सरकारी कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पो.ह. नितीन गोगावले, पो.ह. निलेश राजपुरे, पो.शि. विक्रम कणसे यांनी केली.