भोर पंचायत समितीच्या सभागृहात भरली मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची शाळा
भोर : शालेय मुलांमधील क्षमता विकास व सर्वांगीण प्रगतीसाठी असलेला ‘प्रेरणा प्रोग्रॅम’ संपुर्ण तालुक्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमात शाळा प्रमुखांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शनिवारी (दि. २१ सप्टेंबर) भोर पंचायत समितीच्या सभागृहात मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात केले होते.
रचना संस्था पुणे व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित कार्यशाळेत मुलांसाठी सुरू असलेल्या पर्यावरण जागर, आरोग्य व आहार मार्गदर्शन, मोबाईलचा नियंत्रित वापर, भाषा व गणिताचा नियमित जादा सराव तसेच घरोघरी अभ्यास कोपरा आदी उपक्रमांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील ३० शाळांचे मुख्याध्यापक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. यावेळी अध्यापन व अध्ययन, मूल्यमापन, मुलांच्या वर्तनविषयक समस्या व निराकरण आणि गाव समाजाचा शिक्षण प्रक्रियेतील सहभाग याबाबत येणाऱ्या अडचणी, त्यामागील कारणे व उपाययोजना अशा विषयांवर गटचर्चा घेण्यात आली.
मुख्याध्यापक विजय कारभळ, अविनाश कुचेकर, मंदाकिनी तासगावकर व शैला कोठावळे यांनी बालकांच्या विकासातील समस्या, कारणे व उपाययोजना याबाबातच्या माहिती दिली. कोंडे यांनी भारतीय प्राचीन ज्ञान प्रणालीबाबत बोलताना मुलांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ करण्याची गरज व त्यासाठी शिक्षकांची अपेक्षित भूमिका स्पष्ट केली. अंकुश परुळेकर व महेंद्र सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी शुभांगी घाडगे, मयुरी पवळे, अबोली पडवळ यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी उंबरकर यांनी केले. जयश्री वाल्हेकर यांनी आभार मानले.