जनावरांची बेकायदा कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या फलटण मधील टोळीला केले तडीपार
फलटण : सातारा जिल्हयामध्ये फलटण तालुक्यात बेकायदा जानवरांची कत्तल करुन मासांची विक्री करणार्या तिघा जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी तडीपार केले. सदर आरोपी हे फलटण येथील राहणारे आहेत.
मुबारक हानिफ कुरेशी (वय ३३ वर्षे), शाहरुख जलील कुरेशी (वय ३० वर्षे), आजिम शब्बीर कुरेशी (वय ३४ वर्षे, सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण) अशी तडीपार केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण येथे संशयित टोळी बेकायदा जनावरांची वाहतूक करुन कत्तल व मांस विक्री करत होती. याबाबतचे या टोळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि सुनिल शेळके यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा, सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुका, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका हद्दीतून दोन वर्षे तडीपार करण्या बाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे पाठवला.
तसेच संशयित टोळीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात होती. मात्र त्याचा त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सुनावणी घेवून या टोळीला दोन वर्षासाठी तडीपार केेले. दरम्यान, नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत १५ उपद्रवी टोळयांमधील ४९ जणांना तडीपार करण्यात आले आहे.