पुणे-सातारा महामार्गावर किकवी गावच्या हद्दीत भरधाव बसच्या धडकेत किकवी गावच्या माजी सरपंच वर्षा जाधव यांचा मृत्यू
किकवी : पुणे-सातारा महामार्गावर किकवी(ता.भोर) गावच्या हद्दीत हॉटेल हर्षराज गार्डन समोर पुण्यावरून साताराच्या दिशेने जात असणाऱ्या भरधाव बस (एम एच १० डी टी ३९३६) ने धडक दिल्याने किकवी येथील वर्षा सोपान जाधव (वय ६४ वर्षे) या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी ४:१५ च्या सुमारास घडली आहे. मृत वर्षा जाधव या किकवी गावच्या माजी सरपंच होत्या. जाधव या रस्ता क्रॉस करत असताना हा अपघात झाल्याचे वृत्त आहे.
अपघाताची माहिती मिळताच राजगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी भोर उपविभागीय रुग्णालयात पाठविला. याबाबत लालासाहेब शंकर चव्हाण (वय ५५ वर्षे, रा. किकवी, ता.भोर) यांनी राजगड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात याबाबत बस चालक संदीप नामदेव नरोटे (वय ४० वर्षे, रा. सोनी, ता. मिरज, जि. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार मयूर निंबाळकर करीत आहेत.